‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार’ जयाजी पाईकराव यांना जाहीर; रविवारी सोहळा
औरंगाबाद – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा २०२१ चा ‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार’ यंदा हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते जयाजी पूरभाजी पाईकराव यांना घोषित झाला आहे. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी चार दशकाहून अधिक काळ ते काम करत आहेत. येत्या रविवारी भाईंच्या स्मृती दिनी पुरस्कार प्रदान समारंभ होत आहे. कृषिभूषण विजय अण्णा बोराडे यांच्या हस्ते पाईकराव यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्मृती चिन्ह, शाल-श्रीफळ आणि रोख रुपये एकवीस हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे यंदाचे १८ वे वर्ष आहे.जयाजी पाईकराव यांच्या सातत्यपूर्ण कामाच्या अनुषंगाने पुरस्कार निवड समिती ने एकमताने त्यांच्या नावाची घोषणा केली, संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.बी. वराडे यांच्या मार्गदर्शनाखालील या समितीमध्ये सहसचिव सारंग टाकळकर, संशोधन सह संचालक डॉ. रश्मी बोरीकर, डॉ.शिरीष खेडगीकर, डॉ. रा.शं. बालेकर, सुरेश देशपांडे यांचा समावेश होता.
पाईकराव यांनी हिंगोली आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्य केले आहे. आधी कयाधू ग्रामविकास प्रतिष्ठान आणि नंतर उगम ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून ते काम करत आहेत. दुष्काळ निवारण, उपजीविका प्रोत्साहन, जैवविविधता संवर्धन, सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, सूक्ष्म पतपुरवठा अशा विविध अंगी कामातून शाश्वत विकासासोबतच वंचित समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे अशी कामे हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सुरु आहेत. याची दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेने यंदाच्या ‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कारासाठी जयाजी पाईकराव यांची निवड केली.
यापूर्वी गंगाप्रसाद अग्रवाल, झुल्फेकार हुसैन, बद्रीनारायण बारवाले, ताराबाई परांजपे, भुजंगराव कुलकर्णी, अशोक बेलखोडे, निर्मलदादा, डॉ.माधवराव चितळे, ओमप्रकाश वर्मा आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.