नवरदेवाला मित्राचा हट्ट नडला , हळदीच्या कार्यक्रमांत तलवार घेऊन नाचणाऱ्या नवदेवाच्या हातात बेड्या
औरंगाबाद शहरात हळदीच्या कार्यक्रमात मित्राने तलवार घेऊन नाचण्याचा हट्ट नवरदेवाला केला तो मात्र त्याला चांगलाच भोवला आहे. तलवार व जंबिया घेऊन नाचणाऱ्या सहा तरुणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २६ जानेवारी रोजी रेणुकानगर परिसरात बिभीषण अनिल शिंदे (२१) याच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख वय २०, रा. लतीफनगर, सातारा याने तलवार व शुभम सुरेश मोरे वय २२, रा. रेणुकानगर याने दोन जंबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला लागले.
त्यांच्यासोबत बिभीषण व यश पाखरे वय १९, शेख बादशहा शेख बाबा २२, किरण गोरख रोकडे २२ यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये व्हिडिओ केला . नंतर ते सोशल मीडियावर अपलोड करताच पुंडलिकनगर पोलिसांच्या हाती लागले. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ सर्वांना अटक करण्याचे निर्देश दिले. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलिस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे यांनी सर्वांचा शोध घेत अटक करून हत्यारे ताब्यात घेतली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली . याचा पुढील तपास दादाराव राठोड करत आहेत.