नाना पटोलेचा “गावगुंड मोदी” अखेर समोर आला, कोण आहे हा मोदी ?
नागपूर :- काही दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेला ‘गावगुंड’ मोदी अखेर समोर आला आहे. नाना पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले होते तो मीच असून माझे टोपण नाव मोदी असल्याचे उमेश प्रेमदास घरडे याने पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी हे नाव उच्चारून केलेल्या वक्त्व्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापलं होत. मात्र हे वक्तव्य पंतप्रधान मोदींबाबत नसून मोदी हे टोपण नाव असलेल्या गावगुंडाबद्दल होते, असा दावा पटोले यांनी केला होता.
तसेच या नावाची व्यक्ती नसल्यास आपल्यावर कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी दिले होते. परंतु, पटोलेंचे ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबाबतच होते, असा आरोप करीत भाजपने या मुद्यावरून संपूर्ण राज्यभर आंदोलन केले व ठिकठिकाणी पटोलेंविरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. सोबतच पटोले यांनी त्यांचा ‘मोदी’ पुढे आणावा अशी मागणी होत होती. त्यामुळे हा मोदी नेमका आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वानाच पडला होता.
काल शुक्रवारी अचानक उमेश घरडे हे त्यांचे वकील अॅड. सतीश उके यांच्या समवेत प्रेस क्लबमध्ये अवतरले व पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले तो मोदी आपणच असल्याचा दावा, केला. घरडे हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात ‘मोदी’ या टोपण नावाने ओळखले जातात. ते कधीकाळी दारूच्या अवैध व्यवसायातही होते. त्यांनी पटोले यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली होती, असे अॅड. सतीश उके यांनी घरडे यांच्यावतीने सांगितले. नाना पटोलेंचे वक्तव्य प्रसारित झाल्यावर घरडे घाबरले. त्यांनी पटोले यांना, त्यांच्या पक्षाला, मतदान करू नका, असे लोकांना धमकावले होते, असा दावाही उके यांनी केला.