नावात काय यापेक्षा गावात काय ? शहरांची नाव बदलून प्रश्न सुटेल ?
सध्या एक देशभरात शहरांची नावं बदल, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि स्टेडियम सुद्धा ! यांची नावं बदलून टाकायची. का? तर तो जनतेच्या-त्या भागाच्या अस्मितेचा प्रश्न झालाय. जनतेच्या समस्यांपेक्षा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न जेव्हा महत्त्वाचा मानला जातो तेव्हा हे मतपेटीचे राजकारण आहे हे खुशाल समजावं. नावं बदलण्याचा ट्रेंडच सुरु झालाय.
उर भरून येत सांगताना की, ७४ वर्ष झाले आपण स्वतंत्र झालो, अपवादात्मक शहर वगळता बाकी सर्वच शहरातील नागरिक आज देखील रस्ते, पाणी, शहरातील अस्वच्छता आणि वीज या मूलभूत गरजा पासून वंचित आहे, बस स्थानक आणि रेल्वेच्या स्टेशन अशी ठिकाणे ज्या ठिकाणी रोज हजार लोक प्रवास करता, तीच अवस्था बघत आहोत. मूलभूत सुविधाच सुटत नाहीत आणि आपण वरवरचा देखावा करतोय. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलण्याचा प्रयोग झाला, तर अनेक राज्यात शहरांची नावं बदलण्याचा सपाटा लावण्यात आलाय.
औरंगाबादचं संभाजीनगर करायचं या वाक्यावर तर दोन दशकं औरंगाबादच्या निवडणुकांमध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा ठरवला जातोय. नावं बदलणं ही जनसामान्य माणसाची इच्छा आहे का..? तर नाही हा फक्त राजकीय निवडणुकीचा मुद्दा आहे. नामकरण करून सत्ताधारी जनतेला मूळ विकासाच्या मुद्यांवरून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे का ? आज देखील शहर मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. नागरिकांना वेळेवर पाणी नाही, तासभर पाऊस शिल्लक पडला की संपूर्ण शहरात तळी साचतात. धुळीच्या वाढत्या प्रमाणात नागरिकांच्या आजार पणात देखील वाढ होतेय. मग या मूलभूत प्रश्नांना शासन उत्तर देऊ शकणार नसेल तर करायचं काय अशी नावं बदलून ? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
आता औरंगाबादेत मनपाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे, तसाच नामकरणाच्या मुद्दावर भाजप आणि मनसे, शिवसेना नामकरण व्हावे म्हणून प्रयत्न करीत आहे, यात काँग्रेस आणि रा. काँग्रेसचे नेते मात्र मौन बाळगून आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहराचे, एअरपोर्ट व रेल्वे स्टेशनचे नामकरण करण्यात प्रथम क्रमांकावर आहेत, अलाहबादला आता प्रयागराज असं नाव देण्यात आलं आहे. फैजबादचे आयोध्या, गोरखपूर एअरपोर्ट महायोगी गोरखनाथ एअरपोर्ट म्हणून ओळखले जाणार आहे.
मूळ मुद्दा असा आहे, केवळ शहराचे नाव बदलून परिस्थिती बदलणार नाहीये त्यासाठी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा समजून विकास कामाला प्राधान्य देने गरजेचे आहे, एखादा साथीचा रोग आल्यावर तुम्हाला कळतंय की, आपल्याकडे रुग्णासाठी बेड कमी आहेत,ऑक्सिजन देखील उपलब्ध होत नाहीये ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी अनुभवली आहे. शहरातील वाढलेले गुन्हे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, ज्या महापुरुषांचे नाव तुम्ही देणार आहात त्या नावाला शोभेल असं शहर उभं करण्यात तुम्ही आम्ही प्रयत्नशील राहावं.