‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी दि. ६ सकाळी आकुर्डी येथे उघडकीस आली. रितू भालेराव (वय २१, रा. आकुर्डी, मूळगाव औरंगाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती घरमालकाने रविवारी सकाळी सहाच्या सुमारास निगडी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आत पाहिले असता त्यांना रितू हिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता रितू आणि आणखी एकजण मागील पाच महिन्यापासून पती-पत्नी असल्याचे सांगून आकुर्डीत राहण्यास होते.
रितू ‘एमपीएससी’चा अभ्यास करीत असल्याचे तेथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. रितूचा खून झाल्यानंतर तिचा मित्र फरार झाला आहे. तिचा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत. रितूच्या मित्राचा शोध घेण्यासाठी निगडी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.