महिलेचा विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना,
सकाळी महिलेचा विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आज सकाळी विधानसभेत सभागृहाचे कामकाज सुरू असताना एका महिलेने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाला. महिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणारी महिला नाशिक येथील रहिवासी असल्याचे कळते. ती नाशिकहून मुंबईला आली होती. तिने तेथील पोलीस आयुक्तांवर काही गंभीर आरोप केले आहेत. ही महिला एका संघटनेची सदस्य असल्याचे समजते.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेने नाशिक पोलीस आयुक्तांवर काही आरोप केले असून आपल्या कुटुंबीयांवर जाणूनबुजून काही आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे , माझ्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले असेही तिचे म्हणणे आहे. अनेकदा पोलीस आयुक्तालयात जाऊनही माझे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असेही ही महिला म्हणाली.