महिलांनो… साक्षर आहात,आर्थिक साक्षर व्हा!
महिलांनी व्यवहार व गुंतवणूक समजून घेणं काळाची गरज आहे.
एक अशी महिला जी केवळ आर्थिक साक्षर नाही तर ती अनेक उद्योग व्यवसायांची आर्थिक गणितं बघते, सांभाळते . हे करताना ही होम फ्रंटवरही सक्षमपणे काम करते आणि एवढंच नाही सी.ए. संघटनेची अध्यक्ष देखील बनते…कोण आहे ही महिला आणि कसा झाला तिचा प्रवास? काय आहे यशाचे गुपीत..जाणून घेऊ!
शाळेपासूनच कायम अव्वल राहिलेल्या रेणुका देशपांडे यांच्याशी झालेल्या संवादाचा हा संक्षिप्त अंश.
शाळा कॉलेज ते सीए असोसिएशनच्या अध्यक्ष पदापर्यंत चा प्रवास कसा होता.?
-माझं बालपण यवतमाळ मध्ये गेलं आहे, नंतर आम्ही औरंगाबाद मध्ये आलो, महाराष्ट्र पब्लिक स्कूल मध्ये माझं दहावी पर्यत शिक्षण झालं, त्यावेळी वाणिज्य शाखेतून पदवी घेणारे विद्यार्थी कमी होते. त्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअरिंग या दोन क्षेत्रात स्पर्धा होती, मलाही सर्वांनी सल्ला दिला होता की विज्ञान शाखेतून डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग करावं, पण मी माझा निर्णय घेतलेला होता. की सीए व्हायचं, कारण वाणिज्य शाखेकडे कल वाढलेला.
सीए साठी article ship करावी लागते, मी articleship पूर्ण केली त्यावेळी 300 रुपये महिना मिळायचा त्यात मी सीए परीक्षेस लागणारी फी भरायचे.
बी कॉम ला असताना माझं लग्न झालं, तरी मी माझा अभ्यास मात्र चालूच ठेवला. दरम्यान मुलगी झाली तनिशा, माझी मुलगी दोन महिन्याची असताना मी सीए ची परिक्षा दिली आणि सीए झाले.
*
रेणुका! एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळताना आई म्हणून तनिशाच्या स्पर्धा आणि अभ्यास याकडे कस लक्ष देतेस.?
-माझी मुलगी चेस खेळते. सुरवातीला मला बरेच जण सांगायचे तू तिच्या बरोबर दुसऱ्या कुणाला पाठवायला हवं. पण कुठल्याही खेळात करिअर करणं सोप्पं नसत त्यामुळे घरातील कुणीतरी एक व्यक्ती सोबत राहणं गरजेचं असत. जेव्हा तिच्या स्पर्धा असतात त्यावेळी मला जो काही वेळ मिळेल त्यात मी माझं काम करत असते. आपण स्वतः ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. एकदा माझं टॅक्स ऑडिट आणि तनिशाची स्पर्धा सोबतच होती मी त्यावेळी मी संध्याकाळी 7 ते रात्री 2 पर्यंत ऑफिसची कामे पूर्ण करत होते. पुन्हा सकाळी 5 वाजता तनिशा सोबत स्पर्धेत जात असे.
*
सीए म्हणून ज्यावेळी तू काम करते त्यात पुरूष क्लाईन्ट आहेतच पण महिला किती आहेत, याबद्दल तुझा काय अनुभव आहे. ?
-खुप कमी महिला आहेत की ज्या पूर्ण व्यवहार बघतात, परंतु बहुतांश महिला या OTP सांगायचं काम करतात, बाकी सर्व कांम त्याचे पती बघतात.
सर्व क्षेत्रात महिला आज पुढे आहेत पण अशा व्यवहारात मात्र महिलांचं प्रमाण कमीच आहे. आजचा काळ अनिश्चित आहे घरातील गुंतवणुकीची व्यवहाराची किमान माहिती ठेवणं गरजेचं आहे.
*
बऱ्याच महिला लहान मोठे उद्योग चालवतात, त्यांना रिटर्न बद्दल जास्त माहिती नसते. आणि रिटर्न दाखल करा म्हटलं की आपल्याला टॅक्स भरावा लागेल असा त्यांचा भ्रम असतो. याबद्दल काय सांगशील.?
– इन्कम टॅक्स अॅक्ट नुसार पाच लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स लागत नसतो पण त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा एखाद्या महिलेला वाटते की , आपला व्यवहार वाढला आहे त्यासाठी आपण बँकेतून आर्थिक मदत घ्यायला हवी, त्यावेळी मात्र बँकेत अडचण येते.महिला खर्चाचे नियोजन पुरुषापेक्षा चांगलं करू शकतात. त्याचबरोबर काळाची गरज लक्षात घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. यासाठी सुरूवात बँकिंग समजून घेण्यापासून केली पाहिजे. मग घरातील अन्य आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक याची माहिती घेणं गरजेचं आहे.