महाकुंभ मेळा:- कोटींची उलाढाल अन संस्कृतीचा संगम!
महाकुंभ मेळा ज्या शब्दाने अलीकडे आपल्या कानावर गारूड घातलं असेल. एकदातरी मित्र मैत्रिणी किंवा आपल्या नातलगांनी तुम्हाला चला कुंभमेळ्याला जाऊया का? असा प्रश्न नक्कीच केला असेल. तब्बल १२ वर्षांच्या काळात एकदा आयोजन होणाऱ्या या कुंभमेळ्याचं खास वैशिष्ट्य काय आहे? या कुंभमेळ्याच्या आयोजनात कोटींची उलाढाल घडते ती नेमकी कशी घडते याविषयी सविस्तर पाहुयात.
सध्याच्या घडीला कुंभमेळा हा लोकांच्या ओठांवरचा शब्द झाला आहे. कारण प्रयागराज अर्थात आधी अलाहाबाद असलेल्या ठिकाणी उत्तर प्रदेश मधे कुंभमेळा पार पडणार आहे. गंगा नदीच्या पवित्र तटावर खासकरून प्रयागराज जिथे गंगा, यमुना अन सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो तिथे कुंभमेळ्याचं मुख्य आयोजन केल्या जातं.
कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. या सोहळ्याची मुळे प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये सापडतात, ज्यामध्ये अमृतमंथनाच्या कथेसोबत कुंभ (घडा) आणि अमृताचा संबंध सांगितला आहे.
कुंभमेळ्याचा उगम:-
पौराणिक कथा सांगते की, देव-दानवांनी एकत्रितपणे समुद्रमंथन केले आणि त्यातून अमृत प्राप्त झाले. अमृताचे कुंभ (घडे) प्रजापती बृहस्पती यांनी वायुमार्गे नेले. या प्रवासादरम्यान अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले:-
1. प्रयागराज (उत्तर प्रदेश)
2. हरिद्वार (उत्तराखंड)
3. उज्जैन (मध्य प्रदेश)
4. नाशिक (महाराष्ट्र)
ही चार ठिकाणे कुंभमेळ्यासाठी पवित्र मानली जातात.
कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व:-
कुंभमेळा हा धर्म, श्रद्धा, आणि आत्मशुद्धीचा महोत्सव मानला जातो. या काळात लाखो साधू, संत, भक्त, आणि पर्यटक एकत्र येऊन गंगा, यमुना, सरस्वती (प्रयागराजला), गोदावरी (नाशिकला), आणि क्षिप्रा (उज्जैनला) या नद्यांमध्ये स्नान करतात. या स्नानाला ‘मोक्षस्नान’ म्हटले जाते, कारण असे मानले जाते की या स्नानाने पापक्षालन होते.
धार्मिक तत्त्वज्ञान:-
हिंदू धर्मातील ‘संसार’ आणि ‘मोक्ष’ यावर आधारित तत्त्वज्ञान कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी आहे. माणसाने जीवनातील आसक्ती दूर करून आत्मिक शुद्धीकडे प्रवास करावा, असा संदेश या सोहळ्याद्वारे दिला जातो.
कुंभमेळ्याची खास वैशिष्ट्ये:-
1. अखाडे आणि साधू
विविध अखाडे (संतांचा गट) यात सहभागी होतात. नागा साधू, अवधूत, आणि परंपरागत संतांचे दर्शन हा या मेळ्याचा मुख्य भाग असतो.
2. धार्मिक विधी आणि यज्ञ
विविध प्रकारचे यज्ञ, धार्मिक प्रवचने, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होतात.
3. अर्धकुंभ आणि पूर्णकुंभ
कुंभमेळा प्रत्येक बारा वर्षांनी भरतो, तर अर्धकुंभ सहा वर्षांनी भरतो. महाकुंभ प्रत्येक 144 वर्षांनी होतो.
आधुनिक काळातला कुंभमेळा:-
कुंभमेळ्याला युनेस्कोने “मानवी वारसा” म्हणून मान्यता दिली आहे. आधुनिक काळात या सोहळ्याने केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून जगभर प्रसिद्धी मिळवली आहे.
कुंभमेळा हिंदू धर्माच्या वैविध्यपूर्ण परंपरांचे प्रतीक असून, त्यातून धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म यांची सांगड घातली जाते.
हे झालं संस्कृती आणि कुंभमेळ्याच्या माहितीबद्दल आता यात कोट्यावधींची उलाढाल कशी होते? हे सोप्या समीकरणातून जाणून घेऊयात.
कुंभमेळ्याला सरासरी आकडेवारी पकडली तरी जवळपास कोट्यावधी लोक इथे येऊन जातात. या दरम्यान त्यांच्या राहण्याची, खाण्या पिण्याची, चहा नाष्ट्याची अन इतर सर्व दैनंदिन जीवनातल्या आवश्यक गोष्टींची सुविधा मिळणं गरजेचं आहे. ही सुविधा पुरविण्यात येताना ट्रॅव्हल्स पासून ते अगदी तुम्हाला रहायची सोय करण्यापर्यंत विविध रूम रेंटवर देणारे एजेंट सक्रिय असतात. याचसोबत मेळ्यात येणाऱ्यांना चहा विक्रेते, नाष्टा विक्रेते, साक्षात पवित्र गंगेत तुम्हाला फिरवणारे नावाडी या सर्वांची गिनतीच अफाट आहे.
एवढ्या भव्य प्रमाणात हा सोहळा घडतो त्यामुळे तिथे कोट्यावधींची ऊलाढाल सहज शक्य होत्या, याव्यतिरिक्त सामाजिक संस्था, विविध मंदीरांचे ट्रस्टी व इतर व्यक्ती स्व-इच्छेने लाखो करोडो रूपये दानधर्म करत असतात.
#mahakumbh2025