काशी विश्वनाथ कॉरिडॉर एक अभूतपूर्व अध्यात्मिक पर्व !
अरुंद गल्ल्यांमधून होणारा प्रवास, दर्शनासाठी होणारी दमछाक आणि गर्दीतीळ घुसमट हे थांबवणारे एक कौतुकास्पद काम वाराणसीमध्ये झाले. भारतीयांच्या आस्थेचा हा उच्चम बिंदू आणि संस्कृतीचा भक्कम स्तंभ मानला जातो. कमी कालावधीत पूर्ण झालेल्या या कामाने काशीचा कायापालट होताना धार्मिक पर्यटनाला नवा आयमही दिला आणि ही मोठी बाब आहे. हजारो वर्षांचा इतिहास पुनरुत्थानामुळे पुन्हा तेजस्वी झाला असे म्हणावे लागेल. भारतीयांच्या श्रद्धेचे हे परम स्थळ.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर थेट गंगा घाटापर्यंत नेल्याने या कामाचे महत्त्व आणखी वाढले आहे. सभोवतालची चारशे जुनी घरं पाडून जमीन संपादन करणे हे कठीण काम होते विरोध होणार होता, झालाही, इच्छाशक्तीचा परिचय देत हे काम पूर्ण करणाऱ्या यंत्रणेचे कौतुक आहे. मुघल आक्रमणात क्षती निर्माण झालेले हा मंदिर परिसर नव्या दिमाखात उभा राहणे ही श्रद्धावान नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. फक्त तीन हजार चोरीस फुटातील हा परिसर आता चार लाख चौरस फुटापेक्षा अधिक विस्तारला गेल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ तर होईलच पण इथल्या सुविधांमुळे सुखदही होणार यात शंका नाही. विशेष म्हणजे दक्षिण टोक असलेल्या अस्सी घाटावरून उत्तर टोकाला नावेतून जाणे शक्य होईल आणि ते देखील अतिशय कमी वेळात. यामुळे गंगा घाट बघत प्रवास आणि गर्दी टाळून घाट ते घाट अंतर पार करता येणार आहे. काशी आणि परिसरातील धार्मिक पर्यटनाला उत्साहित करणाऱ्या, चालना देणाऱ्या या भव्य प्रकल्पासाठी योगी सरकारचे अभिनंदन ! आपल्या संस्कृतीमधील काशी महात्म्य अबाधित राखताना त्याला उजाळा देणारे हे काम आहे.