अपघात ग्रस्त तरुणावर तातडीने उपचार श्रीगुरुजी रुग्णालयात तरुणास मिळाले जीवनदान

एका अपघात ग्रस्त तरुणावर तातडीने उपचार करून अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया वेळेत झाल्याने त्यास जीवनदान मिळाल्याची घटना नाशिकमध्ये श्रीगुरुजी रुग्णालयात घडली.
काल दिनांक ७ रोजी संध्याकाळी श्री बापुलाल जैसवाल वय वर्षे २७ वर्षे हे एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून साधारणपणे बारा पंधरा फुटावरून खाली पडून त्यांच्या दोन्ही खुब्यामध्ये साधारणपणे सहा फुटाची लोखंडी सळई आरपार घुसली. त्यांच्या सहकाऱ्याने तातडीने उपचारासाठी जवळील श्रीगुरुजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणले.

श्रीगुरुजी रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटने लागलीच डॉ राजेंद्र खैरे यांच्या मार्गदर्शना खाली सतर्कता दाखवून वेळेत उपचार सुरु केले. लोखंडी सळई आरपार घुसल्याने मोठ्या जोखमीचे काम होते. आतमध्ये किती प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे, पोटातील कोणकोणत्या अवयवाला किती इजा झाली आहे, याचा अंदाज लावणे कठीण होते. म्हणून तातडीने x-ray व 3D – CT स्कॅन करण्यात आले . लोखंडी सळई दोन्ही खुब्यामधून आरपार गेल्याने मूत्राशय, रक्तवाहिन्या, लहान मोठे आतडे यांनाही आघात झाल्याचे प्रथम दर्शनी वाटत होते म्हणून तातडीने सोनोग्राफी करण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत म्हणजे केवळ अर्ध्या तासात संध्याकाळी साडे सात ते आठ च्या दरम्यान यासर्व चाचण्या करण्यात आल्या. सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र खैरे यांची ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व आठ वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी ओपरेशन थीएटर सज्ज करण्यात आले.

साधारणपणे एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत पोट उघडून सहा फुटाचा लोखंडी रॉड बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. आणि ९ वाजता बापुलाल यांना अतिदक्षता विभागात अॅडमीट करण्यात आले.
या सर्व मोहिमेत श्रीगुरुजी रुग्णालयाची टीम अत्यंत कमी वेळेत हजर झाली व वेळेवर उपचार सुरु झाले. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र खैरे, जनरल सर्जन डॉ अमोल आहेर, भुलतज्ज्ञ डॉ अमोल कदम, रेडीओलॉजीस्ट डॉ अविनाश साबळे, पॅथॉलॉजीस्ट डॉ गिरीश चाकूरकर, अतिदक्षता विभागाचे डॉ सचिन देवरे इत्यादी सर्व डॉक्टरांची टीम वेळेवर उपलब्ध होऊन ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली.

बापुलाल जैसवाल यांना वेळीच उपचार व वेळीच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जीवनदान मिळाल्याची भावना कुटुंबियाच्या चेहऱ्यावरून दिसून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *