ति ‘सॉरी’ म्हणाली असती तर ..! औरंगाबाद जळीतकांड प्रकरण तपासात महत्वाची माहिती समोर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वादात एका प्राध्यापकाने मध्यस्थी करीत दोघांचे १२ नोव्हेंबर रोजी समुपदेशन करून समजावून सांगितलं .
तरुणाने तरुणीला यापुढे त्रास देणार नाही, असा शब्द दिला. मात्र, त्यासाठी एकदा माझी फसवणूक केल्याबद्दल सॉरी’ म्हणावे अशी अट घातली. त्यावर तरुणीने आपण कोणाचीही फसवणूक केलेली नसल्यामुळे ‘सॉरी’ म्हणण्यास नकार दिला. वाद विकोपाला गेल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी एका तात्कालिक कारणामुळे त्याचे पर्यवसान जळीतकांडात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.
विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे याने जाळून घेत सहकारी संशोधक विद्यार्थिनीला कवटाळल्याचा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. बुधवारी तपास पथकाने पीडित तरुणीकडील पेन ड्राइव्ह, व्हॉट्सअॅप चॅट जप्त केले आहेत.
त्याशिवाय विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख, दोघांच्या पीएच.डी.चे मार्गदर्शक, विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, तरुणासह तरुणीचे मित्र मैत्रीण यांचे जबाब नोंदवले. त्यातील एका प्राध्यापकाच्या जबाबानुसार मृत तरुणाने त्यांच्याकडे पीडित तरुणीने फसवणूक केल्याविषयी तक्रार केली, होती. प्राध्यापकाने दोघांना १२ नोव्हेंबर रोजी समोरासमोर बसवून समुपदेशन केले. तरुणाने एकदा “सॉरी’ म्हणण्याची अट घातली. मात्र तरुणीने ती मान्य केली नाही. याविषयीचे व्हॉट्सअॅप मेसेजही तरुणाने संबंधित प्राध्यापकाला पाठविले होते.
पूर्वी देखीलआत्महत्येचा गजाननचा प्रयत्न
मृत गजानन याने १५ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात १५ सप्टेंबर रोज़ी अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. तसेच त्याने पीडितेच्या हातात काडीपेटी देत आग लावण्यास सांगितले. तेव्हा तरुणी घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर तिने मृताच्या वडिलांनाही मुलाला समजावून सांगा, असे फोनवरून सांगितले होते. याविषयीचे रेकॉर्डिंगही पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्याशिवाय इतरही दोन वेळा तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले.
या कारणाने घटना घडली..
पीडित तरुणीने १७ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ठाण्यात दिलेला लोकमत न्यूज नेटवर्क तक्रार अर्ज तरुणीने प्राणिशास्त्र विभागप्रमुखांनाही कुरिअरद्वारे पाठवला. त्या अर्जानुसार विभागप्रमुखांनी २१ नोव्हेंबर रोजी तरुणाला विभागात बोलावून घेतले. तेव्हा त्याला तरुणीच्या तक्रारीमुळे तुझी पीएच.डी.ची नोंदणी रद्द करण्यात येईल, त्याविषयीचे तुझे स्पष्टीकरण कुलसचिवांकडे दे, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गजाननने विभागातून थेट वसतिगृहातील खोली गाठत त्या ठिकाणी फळ्यावर सुसाइड नोट लिहिली. त्यानंतर विज्ञान संस्थेत ही घटना घडली.