‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची प्रतिक्रिया

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी भाजपकडून केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील इंतेझार हुसेन सईद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुस्लिम समुदायाबद्दल चुकीचे चित्र दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल एकतर्फी भाष्य केले जात आहे. यामुळे हिंसाचार होण्याची शक्यता आहे, असे या याचिकेत म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींना दिलासा मिळाला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *