उच्चशिक्षित तरुणाची दौतलाबादच्या मोमबत्ता तलावात आत्महत्या, नैराश्याने उचलले टोकाचे पाऊल
एमएस्सी उत्तीर्ण असूनही नोकरी मिळत नसल्याने निराश असलेल्या शशांक दशरथ मोहिते २९ वर्षीय तरुणाने दौलताबादनजीक मोमबत्ता तलावात आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी घर सोडून गेलेल्या शशांकचा मृतदेह शनिवारी सकाळी तलावात तरंगताना आढळून आला .
शशांक मोहिते हा तरुण औरंगाबाद शहरातील पदमपूरा भागात आईवडील, बहीण-भावासोबत राहत होता. सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या शशांकने एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील सेवानिवृत्त असून काही दिवसांपासून आजारी असतात. तर मोठी बहीण अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करते. चांगले शिक्षण घेऊनही शशांकला मनासारखी नोकरी मिळत नव्हती. यामुळे तणावात असलेल्या शशांकने १७ जानेवारी रोजी बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर निघाला तो परत आलाच नाही.
दुचाकीघेऊन गेलेला शशांक रात्री उशिरापर्यंत आला नाही. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी शोध घेतला, फोन केले मात्र मोबाइल बंदच लागत होता. अखेर वेदांतनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हेडकॉन्स्टेबल एस. आर. पठाण यांनी तपास सुरू केला. त्यात शशांक शेवटचा कोकणवाडी चौकातून बाबा चौकाकडे जाताना एका सीसीटीव्हीत दिसला होता .
शनिवारी दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक रविकिरण कदम, पोलिस कर्मचारी महेश घुगे यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्या नंतर तो शशांकचा असल्याचे स्पष्ट झाले.