गुंठेवारी घरे नियमित करताना शुल्काचे हप्ते पाडून देऊ – शिंदे
औरंगाबाद – औरंगाबादेतही गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांची घरे नियमित होणार आहे. यासाठीचे शुल्क एकदम भरणे शक्य नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे होते. यामुळे याचे हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी येत असतानाच हप्ते पाडून देण्याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना केली जाईल, असे आश्वासन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मंगळवारी औरंगाबादेत अनेक रस्त्यांचे भूमिपूजन समारंभ होते. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितले.
शहरासाठी राज्य सरकारने भरघोस निधी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा उपयोग देखील या शहराला होणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. शहरात १५० कोटींचे रस्ते बनविण्यात आले, १६८० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ५ हजार किलोमीटरचा अॅक्सेस रोड तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. कोरोना काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामाला कात्री लावलेली नाही. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.