दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, राज्य शासनाने केले दिवाळी बोनस जाहीर
शिंदे- फडणवीस सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट मिळालं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. यास्तही राज्य सरकारने एसटी महामंडळाकडे ४५ कोटी वर्ग करण्यात आले आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारर २१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आज जारी केले होते.
एसटी महामंडळाचे रखडलेले पगार, रखडलेले भत्ते आणि विविध सवलत मूल्य यासाठी राज्य सरकारने नुकतीच ३०० कोटींच्या निधीला नव्याने मान्यता दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २०२२- २३ मध्ये सरकारने विविध सवलत मूल्यांपोटी १३८८.५० कोटी शिल्लक तरतुदीमधून ३०० कोटींना ही मान्यता दिली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचं चित्र आहे.
एसटी महामंडळानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडे ७३८.५० कोटींची मागणी केली होती. मात्र, राज्य सराकरकडून वित्त विभागाला प्रस्ताव पाठवल्यानंतर ३०० कोटी रोखीनं देण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबरच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दिवाळीच्या काळात एसटीला उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे. एसटीनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ हजार ४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या वर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आंदोलन केले होते.