एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; महागाई भत्यात वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली.
त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला सहा टक्के वाढ होईल. या महागाई भत्ता वाढीमुळे महामंडळावर महिन्याला १८ कोटींचा अतिरिक्त भार पडेल. याचा लाभ महामंडळातील ८९ हजार कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळतो.
गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली. तो ३४ टक्के झाला. याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता द्यावा, यासाठी राज्य सरकारकडे महामंडळाने तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सरकारने बुधवारी याबाबत निर्णय घेतला.
-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो.प्रलंबित महागाई भत्ता मिळावा, म्हणून कामगार संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत होत्या. सलग तीन वेळा कामगार संघटनांनी भेटी घेतल्या होत्या. त्यावर आता निर्णय झाला आहे .