सराफ व्यावसायिकाकडून फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल, कोरेगाव भीमा येथील घटना

पुणे : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील अभय वामन तळेगावकर यांच्याविरोधात संगीता अशोक ढेरंगे (वय 48, रा. कोरेगाव भीमा) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस व तक्रारदार संगीता ढेरंगे यांनी माहिती दिली. या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील ‘तळेगावकर ज्वेलर्स’चे अभय वामन तळेगावकर यांनी २००३ मध्ये फिर्यादी ढेरंगे यांच्या सासऱ्याकडून बेकायदा सावकारी करून कोरेगाव येथील गट नं. १०२४ मधील चार गुंठे जागा व पती अशोक ऊर्फ आबासाहेब ढेरंगे यांच्याकडून सन २००३ मध्ये २० तोळे; तर ८ मार्च २०१७ ते ३० जुलै २०१८ या दरम्यान २१ तोळे सोन्याचे दागिने गहाण म्हणून घेतले. दरम्यान, पती अशोक ढेरंगे यांचे १८ जानेवारी २०१९ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर संगीता यांनी गहाण दागिन्यांची चौकशी सुरू केली.

तळेगावकर सराफ यांच्याकडे दिवंगत ढेरंगे यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या कच्च्या नोंदीच्या पावत्या मिळून आल्या. त्या पोलिसांना सादर करून तळेगावकर यांच्याकडे गहाण दागिन्यांची मागणी केली. मात्र, दागिने परत करताना बेकायदा सावकारी करून तीन लाख रुपये घेऊन केवळ २१ तोळे एवढेच सोने त्यांनी परत केले. मात्र, उर्वरित द्यावयाचे २० तोळ्यांचे दागिने व सासऱ्यांकडून फसवणुकीने घेतलेली ४ गुंठे जागा परत दिली नाही. याबाबतच्या तक्रारीनुसार शिक्रापूर पोलिसांनी १२ मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *