नूपुर शर्मा यांना माजी न्यायमूर्तीचे समर्थन, म्हणाले…
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात नाराजीचे वातावरण आहे. आता काही माजी न्यायमूर्ती आणि नोकरशहांनी या वक्तव्यांवर टीका करणारे एक पत्र लिहिले आहे.
या खुल्या पत्रात या सगळ्या मान्यवरांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आपली लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. यासंदर्भात त्वरित काही दुरुस्ती करायला हवी. या पत्रात म्हटले आहे की, आम्हीही जबाबदार नागरीक आहोत. जोपर्यंत घटनेनुसार प्रत्येक संस्था कार्य करत असते तोपर्यंत देशातील लोकशाही कोणत्याही अडथळ्यांविना चालत असते. पण जेबी पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे लक्ष्मण रेषा ओलांडली गेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे खुले पत्र लिहावे लागले.
शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या जास्त, म्हणून शाळेची प्रार्थना बदलली
अशा प्रकारच्या दुर्दैवी वक्तव्यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशातील न्यायव्यवस्थेवर कायमचा डाग लागू शकतो. त्यामुळे लोकशाही मूल्यांवर होणारे संभाव्य परिणाम तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे.
या पत्रात १५ माजी न्यायाधीश आणि भारतीय नागरी सेवेत असलेल्या ७७ माजी अधिकारी तसेच २५ माजी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश क्षितिज व्यास, गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.एम. सोनी, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.एस. राठोड आदिंचा समावेश आहे. माजी आयएएस अधिकारी आर.एस. गोपालन, एस. कृष्णकुमार, निरंजन देसाई यांच्याही या पत्रात स्वाक्षऱ्या आहेत.
१ जुलैला न्यायाधीश पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी नुपूर शर्मा यांना झापले होते. तुमच्यामुळे देशातील वातावरण बिघडले तेव्हा तुम्ही देशाची माफी मागा, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यावरून न्यायाधीशांवर टीका केली गेली.