माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम वाढला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी केलेला अर्ज अर्ज फेटाळून लावला. तीन प्रमुख मुद्दयांवर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावाला. प्रथमदर्शनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यावरून अनिल देशमुख यांनी मनी लाॅंड्रिंग केल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच सेक्शन ४५ नुसार साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी या क्षणी कोर्ट ते तपासू शकत नाही.

२९ डिसेंबर २०२१ रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने १७ जानेवारी रोजी फेटाळून लावल्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे. ईडीच्यावतीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना ईडीनं देशमुखांच्या जामीनाला विरोध दर्शविला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. २१ एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून १२ तास चौकशी केल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली.

तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात देशमुखांची दोन्ही मुलं ऋषिकेश आणि सलिल यांच्या नावाचाही सहभाग आरोपपत्रात करण्यात आला असून न्यायालयाने दोघांनाही समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *