माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने केली आत्महत्या
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौंदर्या असे तीचे नाव असून ती बी. एस. येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होती. तिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बेंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये सौंदर्या डॉक्टर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या पती आणि ६ महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं होतं. आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
सौंदर्या हिने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सौंदर्याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी सरकारी बाऊरींग रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या बातमीने येडियुरप्पा यांचे कुटुंबीय आणि राज्य भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतल्याची माहिती आहे. सौंदर्या ही पद्मा (BSY ची सर्वात लहान मुलगी) यांची मुलगी आहे. सेंट्रल बेंगळुरूच्या वसंत नगरमधील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. डॉक्टर नीरज यांच्याशी तिचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ती स्वतः डॉक्टर होती.
दरम्यान, येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.