अन्न हे अजूनही पूर्ण ब्रह्म नाही ?
अन्न दशा .. निराशाजनक !
भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलंय. अर्थात हे केवळ आपल्या म्हणण्यात असतं किंवा बोलण्यातच ! प्रत्यक्षात तसं नाही हे नेहमीच लक्षात येत असतं. तुम्हाला माहितीय? अजूनही भारतात ८० कोटीवर नागरिक उपाशीपोटी झोपतात. बाल कुपोषण अजूनही संपलेले नाही. दुसरीकडे आपण ४० टक्के अन्न वाया घालवतो. हा विरोधाभास बघितला तर अन्न हे पूर्णब्रह्म कसं म्हणावं हा प्रश्न पडतो. अन्नाची किंमतच आपल्याला माहिती नाही.
भारतात अन्न वाया जाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भारतात उपासमारीमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. वर्ल्ड हंगर इंडेक्स २०१९ च्या रिपोर्ट नुसार ११७ देशांमध्ये भारताचा १०२ वा क्रमांक आहे. पाकिस्तान बांगलादेश नेपाळ या देशांच्या तुलनेत भारतात उपासमारीचे प्रचंड आहे. आश्चर्यकारक म्हणजे इंग्लंडमध्ये जेवढे अन्न वर्षाला खाल्ले जाते. तेवढ्या अन्नाची नासाडी आपल्या देशात होते.
वर्ल्ड फुल प्रोग्राम स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार भारतात ८२ कोटी लोक उपाशी झोपतात. जगातील प्रत्येक ९ व्यक्तींच्या मागे १ व्यक्ती उपाशी राहते आणि ३ माणसांमध्ये एक कृपोषण ग्रस्त. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार भारतात ४० टक्के अन्न वाया जाते. त्याचबरोबर अन्न आणि कृषी संस्था यांच्या रिपोर्टनुसार जगात घेण्यात आलेल्या उत्पादनापैकी एक तृतियांश अन्नाची नासाडी होते. वर्ड फूड प्रोग्रामचे काम ८३ देशांमध्ये सुरू असून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी १५ अब्ज किलो शिधा वाटप करण्यात येतो. शाश्वत विकासाच्या १७ व्या जागतिक उद्धिष्टापैकी दुसरे उद्धिष्ट उपोषणावर मात करणे हे आहे. ते २०३० पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे उपासमारीमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या ठिकाणी एकाच घरात राहत असलेल्या ५ जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. त्यातील आश्चर्यकारक म्हणजे नऊ महिन्याच्या चिमुकलीचा भुकेने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. आणि एका अडीच वर्षाच्या मुलगी उपाशी असल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळली होती.
भारतात लग्नसमारंभामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये उष्टे किंवा उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाते. हे अन्न निरूपयोगी असल्यामुळे कचऱ्यात टाकले जाते. परंतु हेच उरलेले अन्न जर भुकेल्याना आणि उष्टे अन्न वराह पालनासाठी दिले तर अन्न वाया जाण्याचे प्रमाण घटेल. भारतात कृपोषित बालकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कुपोषण निर्मूलनासाठी देशात आता पासून अति कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांसाठी विशेष धडक शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.. यावेळी शहरात ७२८ तीव्र कुपोषित बालके महिला बालकल्याण विकास आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून आढळली आहेत. या मोहिमेसाठी ४११ पथके बनवण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ५९० बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली असून यातील ७२८ बालके हे अति तीव्र कुपोषित असून ३ हजार ९८२ बालके मध्यम कुपोषित आढळली. १ हजार ७०९ अंगणवाडी केंद्रांचे सर्वेक्षण अजून बाकी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कुपोषित बालकांची संख्या जास्त असून या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या बालकांवर उपचार करण्यासाठी आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम प्रभावी आहे. ही उपासमार रोखण्यासाठी आपण पुढाकार घेणे महत्वाचे आहे. कधीही अन्न फेकून देऊ नका कारण ते अन्न न मिळाल्यामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो!