कुणी मांडला होता, स्वतंत्र्य भारताचा पाहिला अर्थसंकल्प ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या १ फेब्रुवारी रोजी सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. आतापर्यंत त्यांनी ७ पूर्ण अर्थसंकल्प आणि १ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा सरकारचा १४वा अर्थसंकल्प असेल. या निमित्ताने, स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता, हे जाणून घेणे रोचक ठरेल.
२६ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. षन्मुखम चेट्टी यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत सादर झालेला हा एक अंतरिम अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये फक्त सात महिन्यांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. चेट्टी यांनी या अर्थसंकल्पात १९७.३९ कोटी रुपयांचे बजेट मांडले, ज्यामध्ये १७१.१५ कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. बजेटमधील ४६ टक्के, म्हणजेच ९२.७४ कोटी रुपये, संरक्षण क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावरून स्वातंत्र्यानंतर देशाच्या संरक्षण यंत्रणेच्या मजबुतीकरणाला किती प्राधान्य दिले गेले, हे स्पष्ट होते.
अर्थसंकल्प सादर करताना आर. के. षन्मुखम चेट्टी म्हणाले होते, “माझ्या समोर मुक्त आणि स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आहे. हा क्षण नक्कीच ऐतिहासिक ठरेल.” चेट्टी हे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे १७ ऑक्टोबर १८९२ रोजी एका श्रीमंत कुटुंबात जन्मले. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली, तसेच मद्रास लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चेट्टी यांच्यावर भारताचे पहिले अर्थमंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे, त्यांनीच अंतरिम अर्थसंकल्प ही संकल्पना प्रथम वापरली, जी आज तात्पुरत्या अर्थसंकल्पांसाठी वापरली जाते. १९४८ साली चेट्टी यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर केरळचे जॉन मथाई यांनी पुढील अर्थसंकल्प सादर केला.
जरी अर्थसंकल्प अधिक आधुनिक स्वरूपात सादर होऊ लागला असला, तरी त्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया आजही गुप्त ठेवली जाते आणि अंतिम सादरीकरण होईपर्यंत त्याबद्दल माहिती उघड होत नाही.