प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा गोळीबारात मृत्यू
नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारात जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. आज अकराच्या सुमारास त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.या सर्व प्रकारामुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्यावर हा हल्ला कोणी केला अद्याप उघड झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती.
या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघा जणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.