राजकारण

इंधन दरवाढीवरून फडणवीसांचे राज्यसरकारला आव्हान, म्हणले…

Share Now

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे कान टोचले. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर पलटवार केलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

‘दोषारोप आणि जबाबदारी झटकणे! यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू!, असं ट्वीट फडणवीस यांनी केलंय. त्याचबरोबर ‘जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?’ असा सवालही फडणवीस यांनी केलाय.

त्याचबरोबर ‘शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या’, असं थेट आव्हानच फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिलंय.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचे कान टोचले. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधानांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर केंद्राकडून महाराष्ट्राला सुमारे 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *