मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई
ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीच्या संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील ११ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.
श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. ६ मार्च २०१७ मध्ये नोंदवलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही सांगितले. २०१७ मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत.
महेश आणि चंद्रकांत पटेल दोघांच्या मालकीची पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई करण्यात आली . या प्रकरणी तब्बल २१. ४६ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.