४० कोटीचे अमली पदार्थ जप्त, ‘या’ मोठ्या शहरात सुरु होती तस्करी

नवी दिल्ली: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यास दिल्ली पोलिसांना यश आले आहे. तब्बल ४० कोटी रुपये मूल्याचे १० किलो अमली पदार्थ (हेरॉईन) जप्त केले असून या कारवाईत पोलिसांनी दोन तस्करांनाही अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दिनेश सिंग व नझीर ऊर्फ नझीम अशी या दोन आरोपींची नावे असून, ते उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. म्यानमारमधून मणिपूरमार्गे देशात या हेरॉईनची तस्करी करण्यात येत होती. दोन तस्कर झारखंडमधून हेरॉईनचा मोठा साठा घेणार असून, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस-वेजवळ तो साठा अन्य तस्कराला देणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना २४ मार्च रोजी मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली. त्यांच्याजवळून तीन-तीन किलो हेरॉईन असलेल्या दोन पिशव्या, तसेच त्यांच्या वाहनातून ४ किलो हेरॉईन असे एकूण १० किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य असल्याची कबुली या दोन्ही तस्करांनी चौकशीदरम्यान दिली. म्यानमारमधील मोठ्या पुरवठादाराकडून मणिपूरमागे आणले जाणारे अमली पदार्थ पुढे आसाम व अरुणाचल प्रदेशात पाठवले जात असे. तेथून देशभरातील इतर भागात टोळीतील सदस्यांच्या मदतीने या अमली पदार्थांची तस्करी केली जाते, असेही आरोपींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *