विकासात राजकारण करू नका, विकासासाठी सर्व समाज बांधवानी एकत्र येण्याची गरज : आ. संजय शिरसाट
औरंगाबाद :- आमदार संजय शिरसाट यांनी राज्य शासनाकडून विशेष निधीतुन उस्मानपुरा येथील फुलेनगर या भागात असलेल्या मैत्रेय बुद्धविहाराच्या सामाजिक सभागृहाच्या विकास कामांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते या सभागृह बौध्द विहार भूमिपूजन सोहळा सोमवार दि १६ रोजी पार पडला आहे.
संविधान मित्र मंडळ, तथागत मित्र मंडळ व सर्व एकनाथनगर, फुलेनगर, कबीरनगर नागरिकांच्यावतीने आमदार संजय शिरसाट यांचा क्रेनच्या साह्याने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच या भागातील नागरिकांनी मैत्रय बुद्ध विहार येथील सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शिरसाट यांचे आभार मानले .
या भूमीपूजन प्रसंगी आमदार शिरसाट म्हणाले की, जेव्हा या ठिकाणी सभागृह करण्याचे ठरवले तेव्हा मी या भागातील सर्व राजकीय पक्षांचा लोकांना बोलावून त्यांना सांगितले कारण हे काम करत असताना कुणाचा अडथळा निर्माण व्हायला नको, जेव्हा आपल्याला समाजासाठी विकास कामे होत असेल तेव्हा आपल्यात गटबाजी नको, हे काम माझे नसुन तर लोकांच्या हितासाठी आहे.
त्यामुळे अशा कामामध्ये मतभेद बाजूला सारून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे ही माझी भूमिका आहे, पश्चिम मतदार संघात अनेक ठिकाणी सभागृह बांधले, या भागात लोक समाजासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनाला खरा आनंद होतो, माझी इच्छा होती बाकी ठिकाणी मी समाज बांधवांना करीता सभागृह बांधले तसेच एक मोठे सभागृह या ठिकाणी व्हावं जेव्हा हे सभागृह होईल तेव्हा सर्व लोक तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी येतील.
आज खऱ्या अर्थाने मी आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला इतका आनंद झाला नाही पण समाज बांधवांसाठी आज हे सभागृह होते याचा आनंद मला जास्त आहे, या होत असलेल्या सभागृहात मेडिटेशन सेंटर, भन्तेजी यांच्यासाठी रूम, पेव्हर ब्लॉक, आणि बाजूची असलेली भिंत ही देखील नव्याने बांधणार आहे, पण हे सभागृह उत्तमरीत्या स्वच्छ ठेवण्याच काम हे तुम्ही करायला पाहिजे, मी विकास कामासाठी सदैव तत्पर आहे, या भागात असलेले रस्ते, ड्रेनेज लाईनच देखील कामाला सुरुवात होईल एक चांगला परिसर करण्याचा माझा मानस आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विजया शिरसाट, महापौर नंदकुमार घोडले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, हर्षदा शिरसाट, नगरसेविका लता निकाळजे, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, मगन निकाळजे, भन्ते मेत्तानंद, भन्ते कुंलीणपुत्र, भन्ते रोहित, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, प्रदीप जाधव, श्रावण गायकवाड, आनंद कस्तुरे, माणिक साळवे, प्रवीण जाधव, कैलाश घोरपडे, राम पाखरे, रवी जगताप, बालाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.