राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, प्रकृती अस्वास्थ्यामुळे
मस्साजोग हत्याकांड प्रकरण : मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक, वाल्मिक कराड, याला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) दाखल केलेल्या दोषारोप पत्रात हत्याकांडाचे काही धक्कादायक फोटो सादर करण्यात आले. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
शेवटी, या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.”
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात एक्स (Twitter) वर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी माझी ठाम भूमिका आहे. नुकतेच समोर आलेले हत्याकांडाचे फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीला प्राधान्य द्यावे, तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.”
या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.”
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.