आ. संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले.
लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे समोर आले. त्यांची अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकून रक्तवाहिनीतील अडथळा दूर केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला आ. शिरसाट उपस्थित होते. घरी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी ४ वाजता सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब कमी होत नव्हता. त्यामुळे शिरसाट यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी एअर अॅम्ब्युलन्स पाठविली. शिरसाट यांना एअर अॅम्ब्युलन्समधून मुंबईला नेऊन लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणी आणि मुंबईत लीलावती रुग्णालयात हलविण्याचा निर्णय
शिरसाट यांची प्रकृती खालावल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दोनवेळा फोन करून माहिती घेतली. यानंतर शिरसाट यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय त्यांनी घेत एअर अॅम्ब्युलन्स पाठविली. मुख्यमंत्री मुंबईतील लीलावती डॉक्टरांच्याही संपर्कात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
*पोलिसांनी केला ग्रीन कॉरिडॉर*
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाने सिग्मा हॉस्पिटल ते चिकलठाणा विमानतळ यादरम्यान सकाळी ८ वाजता ग्रीन कॉरिडॉर केला. अवघ्या पाच ते सात मिनिटांत शिरसाट यांना रुग्णालयातून विमानतळावर नेण्यात आले.
हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गोखले आणि अन्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्यांची अँजिओग्राफी केली, तेव्हा त्यांची एक रक्तवाहिनी ब्लॉक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लगेच अँजिओप्लास्टी करण्यात आली. सायंकाळी ४.२५ वाजता स्टेंट टाकून रक्तवाहिनीतील अडथळा दूर केल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली. शिरसाट यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा सिद्धांत शिरसाट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रुग्णालयात आहेत.