मोर्चात सहभागी असलेल्या भाजप नेत्यांना अटक
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपनं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. मोर्चा सुरु होण्यापूर्वी आझाद मैदानात भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांनाही सुटका करण्यात येत आहे.
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी सोडले असून इतर नेत्यांचीही सुटका करण्यात येणार आहे.