भाजपा नेते अभिजित सामंत यांनी केली एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हि’ मोठी मागणी
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संप सुरू असून. या संपादरम्यान १०० पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. रखडलेल्या वेतनामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा गाडा सुरळीत कसा चालवायचा याची चिंता होती. त्यामुळेही अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महतेच पर्याय निवडला. यावर आता भाजपा नेते अभिजित सामंत यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे.
अभिजित सामंत यांनी ट्विट केले आहे की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभ दिवशी मी माननीय मुंबई उच्च न्यायालयाला विनंती करतो की, १०० पेक्षा अधिक एसटी कामगारांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणांबाबत सुओ मोटो खटला भरावा आणि राज्य सरकारला त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात यावे. हीच खरी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यापूर्वी काही महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे या विवंचनेत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर काहींनी मुलांच्या शाळांची फी भरता येत नाही म्हणून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. संप सुरू झाल्यावरही महाविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य न केल्यामुळेही संपादरम्यान काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अद्यापही सरकारने या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही किंवा मदतही जाहीर केली नाही. त्यामुळे अभिजित सामंत यांनी ही मागणी केली आहे