महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपट होणार हिंदीत प्रदर्शित
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी देशात सामाजिक बदल घडवून आणण्यात आणि महिलांना शिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली, यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. लोकांच्या जीवनात विलक्षण बदल घडवून आणण्याचे काम करणाऱ्या या पती-पत्नी जोडीवर लवकरच एक बायोपिक बनणार आहे.नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
या चित्रपटाचे पहिले पोस्टर तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. “फुले” असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन ‘फुले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत, तर प्रतीक गांधी आणि पत्रलेखा हे महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.तर हा चित्रपट हिंदीतून प्रदर्शित होणार आहे.
महात्मा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी ‘फुले’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले. फर्स्ट लूक रिलीज होताच लोकांची उत्सुकता वाढली असून, पोस्टरमध्ये प्रतीक आणि पत्रलेखा हुबेहूब महात्मा आणि सावित्री फुले यांच्यासारखे दिसत आहेत. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांनी संयुक्तपणे दीर्घकाळ अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या विरोधात मोहीम चालवली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना मागासलेल्या जातीतील लोकांच्या समान हक्कासाठी लढा दिला. दोघांनीही महिलांना शालेय शिक्षण देण्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.