क्राईम बिट

मोठी बातमी ; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड, साक्षीदारांनी केला महत्वाचा खुलासा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी दोन आरोपींनी हत्या केली होती.

या प्रकरणी आज पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड केली.यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना खून करताना पाहिलं, अशी साक्ष साक्षीदाराने दिली आहे. या प्रकरणी आज न्यायालयात निम्मी ओळख परेड झाली. उर्वरित पुढील ओळख परेड ही २३ मार्चला होईल.

याप्रकरणी वीरेंद्र तांवडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर आरोपी आहेत. यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. हत्येतील पाच आरोपींवर शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात सी.बी.आय मार्फत १५ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपपत्र निश्चित झाले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्याच्या शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या झाली होती.

या प्रकरणाचा तपास घटनेच्या सुरवातीला पोलिसांकडे होता. त्यानंतर सीबीआयकडून तपास सुरु होता. तपासाला अनेकवर्ष लागली. बऱ्याच काळानंतर काही आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आलं होतं.

अखेर १५ सप्टेंबरला आरोपपत्र निश्चित झाले होते. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. नरेंद्र दाभोलकर यांची ज्याक्षणी हत्या करण्यात आली त्याचवेळी या प्रकरणातील साक्षीदार हे शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर साफसफाई करीत होते.

साक्षीदाराची महिला सहकारी देखील त्यावेळी तिथे उपस्थित होती. साफसफाईचं काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांनी दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार करताना पाहिलं.

या गोळीबारात ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती व्यक्ती जमीनीवर पडल्याचं त्यांना दिसलं. आरोपी हल्ला करुन पोलीस चौकीच्या बाजूला पळाले होते. त्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले होते. या प्रकरणी अनेक वर्षांपासून तपास पूर्ण झाल्यानंतर ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड.

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आली होती. याच प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयात सध्या साक्षीदारांचे साक्ष नोंदविणे सुरु आहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचा आज साक्ष नोंदविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *