कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर कर्नाटकातील शिमोगामध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. शिमोगा येथे रविवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या २६ वर्षीय हर्ष या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्यानंतर शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शहरातील सिगेहट्टी भागात काही तरुणांनी अनेक वाहनांची जाळपोळ देखील केली.
हर्ष नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी विरोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. हर्ष नावाच्या तरुणावर कोणी हल्ला केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
याचा हिजाब वादाशी संबंध जोडण्याचा विचारही पोलिस करत आहेत. मारला गेलेला व्यक्ती ७ फेब्रुवारीला हिजाबविरोधात झालेल्या निदर्शनात सहभागी होता, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तरुणावर चाकूने हल्ला केला.
या घटनेवर कर्नाटकचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र म्हणाले की, जातीयवादी शक्ती शालेय विद्यार्थ्यांमध्ये द्वेषाची बीजे पेरत आहेत. या शक्तींना देशाची प्रतिमा डागाळायची आहे. देश अस्थिर करण्यासाठी अनेक शक्ती आपल्यामध्ये सक्रिय झाल्या आहेत. आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. गृहमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.
४-५ तरुणांच्या गटाने त्यांची हत्या केली. या हत्येमागे कोणती संघटना आहे हे मला माहीत नाही. शिवमोग्गा येथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारी म्हणून शहराच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.