औरंगाबाद राजधानी कशाची ? पर्यटनाची की गुन्हेगारांची ?

ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराची पर्यटन राजधानी म्हणून ओळख आहे. पण आता ही पर्यटन राजधानीच गुन्हेगारांची राजधानी बनल्याचं दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून सतत खुनाच्या घटना घडत आहे. मागील महिन्यात संपूर्ण राज्यात गाजलेल्या प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच आता शहरात 48 तासांमध्ये या तीन खुनाच्या घटना घडल्या आहे. वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्यामुळे पोलिसांचा धाक संपला की काय हा प्रश्न उद्भवत आहे.

10 नोव्हेंबर रोजी सकाळी जळगाव रोडवर रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराचे दोन्ही डोळे फोडून त्याची हत्या करण्यात आली होती आणि मारेकऱ्यांनी त्या मयत व्यक्तीला जळगाव रोडच्या कडेला फेकल्याची भयानक घटना उघडकीस आली. ही मृत व्यक्ती औरंगाबाद येथील टाइम्स कॉलोनीत वस्तीस होती, – नाव अबूबकर चाऊस ! 10 तारखेला सकाळच्या सुमारास नागरिक रस्त्याने जात असताना नारेगावकडे जाणाऱ्या वळणावर झुडूपांमध्ये रक्ताने माखलेला व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलीस उपयुक्त दीपक गिर्हे, साह्ययक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे,गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, नाना पटारे, राजेंद्र साळुंके यांनी घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर तो मृतदेह रुग्णलयात दाखल करण्यात आला. मृतांची ओळख पटविण्यासाठी खबऱ्याना कामाला लावले होते. अवघ्या दोन तासात पोलिसांनी या मृताची ओळख पटविली. मयत व्यक्ती अट्टल गुन्हेगार असून अबूबकर वर अनेक गुन्हे दाखल आहे. या अगोदर तडीपार, एमपीडिए कायदा अंतर्गत त्यावर कारवाई देखील करण्यात आलेली असल्याचे उघडकीस आले. मृत व्यक्ती अबूबकर आहे हे समजल्या नंतर पोलिसांनीही तपासाची दिशा ठरवली आणि आरोपी सय्यद समीर याला अटक केली.

मोकळ्या मैदानावर आढळला तरुणीचा मृतदेह
दुसऱ्या घटनेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली इंदुमती एका मोबाइल कंपनीच्या दालनात आठ दिवसांपूर्वीच कामाला लागली होती. मुकुंदनगरमध्ये वडील आणि दोन भावांसोबत ती वस्तीस होती. तिचे वडील आणि भाऊ मजुरी करतात. सोमवारी सकाळी इंदुमती कामावर गेली. पण संध्याकाळी सहा वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या मैत्रीणी, नातेवाईकांकडे शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगरपासून बायपासच्या दिशेने असलेल्या मोकळ्या मैदानावर दूध विक्रीसाठी जाणाऱ्या काही महिलांना तिचा मृतदेह आढळून आला. तिचा हात आणि गळ्यावर व्रण दिसत होते.याबाबत माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी सकाळी तिचे वडील आणि भाऊ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु तिचा मृतदेहच सापडल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. याप्रकरणी भावाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदुमतीचे कुटुंब परराज्यातील असून काही वर्षांपूर्वी ते औरंगाबादमध्ये स्थायिक झाले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, बारकुराय यांच्या गावाकडील एका मुलाशी तिची मैत्री होती. तो संशयित युवक इंदुमतीचा मृतदेह आढळल्यापासून बेपत्ता आहे. खूनाचा संशय त्याच्यावर असून पोलीस युवकाच्या शोधात पुण्याच्या दिशेने गेले होते. मारेकऱ्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तिचा गळा आवळल्याचे व्रण आणि हातावरही मारहाणीच्या खुणा होत्या.

पतीनेच केला पत्नीचा खून

तिसऱ्या घटनेमध्ये पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना उघड झाली होती. चारित्र्याच्या संशयावरून सुनिता शिनगारे यांच्या पतीनेच झोपेत गळा दाबून खून केल्याचे उघड झाले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत सोमवारी डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल दिल्यानंतर या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट केले होते. तोपर्यंत पती पोपट रामराव शिनगारे हा पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबूली दिली. मूळ अंजनडोह येथील रहिवासी असलेला हा पती मजुरी करत होता. नेहमीच पत्नीला मारहाण करत होता.

औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खुनाच्या घटना प्रचंड घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही असं जाणवत आहे. औरंगाबाद येथील प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच शहरात 48 तासांत या तीन खुनाच्या घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *