आघाडीला अपेक्षित यश चव्हाणांचे प्राबल्य वाढले !
आघाडीला अपेक्षित यश
चव्हाणांचे प्राबल्य वाढले !
नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा निवडणूक निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, भाजपने लावलेला जोर आणि अशोकरावांच्या वर्चस्वाच्या लढाईत अपेक्षे प्रमाणे महाविकास आघाडी ने बाजी मारली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांना समाधान देणारा हा निकाल ठरला. यामुळे काँग्रेस मधील त्यांची बाजू आणखी भक्कम झाली असून काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर हे तब्बल ४२ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.
अखेरच्या फेरीनंतर निकालाची घोषणा करण्यात आली तेव्हा काॅंग्रेस महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर यांना १,०८,७८९ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुभाष साबने यांना ६६ हजार ८७२ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीतील मतांपेक्षा कमी मते मिळाली असून डाॅ.उत्तम इंगोले यांना ११,३४७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१,९३३ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने याजागेसाठी मोठा जोर लावला होता. पंढरपूर पोटनिवडणूक जशी जिंकली असे इथेही घडवू अशी भाषा भाजपचा प्रत्येक राज्यस्तरीय नेता करत होता. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक दिग्ग्ज भाजपा नेते झटले होते. पण चव्हाण यांच्या वर्चस्वाचा बिमोड करणं शक्य झालं नाही. भाजपला देगलूर-बिलोलीच्या मतदारांनी नाकारले आहे. या निकालाने सरकार अधिक भक्कम झाल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती. पण नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचाच अवाज असल्याचे आजच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासूनच काॅंग्रेसचे अंतापूरकर हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
मिळालेली मते
जितेश अंतापूरकर ( काॅंग्रेस आघाडी) -१,०८,७८९ (विजयी)
सुभाष साबणे (भाजप)- ६६,८७२
डाॅ.उत्तम इंगोले (वंचित बहुजन आघाडी)-११,३३४