घरी बायकोसोबत भांडण, नशेत विचारले अश्लील प्रश्न ; आरोपी रिक्षा चालकाने दिली कबुली
औरंगाबाद :- रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारून चालकाने रिक्षा भरधाव पळविल्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने त्या रिक्षातून उडी घेतली.
यावेळी मागून येणाऱ्या कारच्या खाली जाण्यापासून मुलगी थोडक्यात बचावली, परंतु भरधाव रिक्षातून उडी घेतल्याने तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयाच्या उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिल्लेखाना चौकानजीक रस्त्यावरील संकल्प क्लासेससमोर रविवारी (दि. १३) दुपारी १२.२५ वाजता ही खळबळजनक घटना घडली. क्रांतीचौक ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने पत्नीसोबत घरात भांडण झाल्यामुळे तणावात दारू पिली. नशेतच मुलीसोबत नको ते बोललो, अशी कबुली त्या आरोपी रिक्षाचालकाने चौकशीत पोलिसांना दिली असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती निरीक्षक डॉ गणपत दराडे यांनी दिली.
सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) या चालकाने गोपाल टी येथून रिक्षात बसलेल्या मुलीला नको तो प्रश्न विचारल्यामुळे तीने धावत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रांती चौक पोलिसांनी तत्काळ रिक्षाचा शोध घेत चालक सय्यद अकबर यास बेड्या ठोकल्या. चौकशीत त्याने कबुली दिली.
काही चालक रिक्षात बसलेल्या मुलींना अशी टॉन्टिंग करतात. त्यांच्यातील गप्पांनंतर आरोपीने मुलीसोबत असे वर्तन केले असावे, असा अंदाजही पोलिसांनी काढला. कोठडीत आरोपीकडून अधिक माहिती मिळेल, असेही पोलिसांनी सांगितले.