अग्निपथ सैन्य भर्ती योजनेमुळे आजही देशात आंदोलन, रेल्वे देखील जाळली
अग्निपथ सैन्य भर्ती योजनेच्या विरोधातील आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.या आंदोलनात बिहारमध्ये योजनेला तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक भागात या योजनेच्या विरोधात तरूण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. लखीसराय आणि समस्तीपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रवासी रेल्वेला आग लावली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली. या आंदोनलामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
काय आहे अग्निपथ येजना येथे वाचा : लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा, सैन्य दलात बंपर भरती
बिहारमध्ये शुक्रवारी सकाळपासून अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोनल सुरू झालं आहे. लखीसराय स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तरूण जमा झाले. त्यांनी या स्टेशनची तोडफोड केली. हिंसक आंदोलकांनी दिल्ली-भागलपूर दरम्यानच्या विक्रमशीला सुपरफास्ट ट्रेनला आग लावली. या आगीत अनेक बोगी जळाल्या. त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मची तोडफोड केली. या आंदोलनात भारतीय रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धरमपूरजवळ संपर्क क्रांती सुपर फास्ट ट्रेनमध्येही आग लावण्यात आली. ही रेल्वे अडवून अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
अग्निपथ भरती योजना: 10वी उत्तीर्ण ‘अग्निवीर’ना मिळणार डायरेक्ट 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
लखीसराय रेल्वे स्टेशनवरील फूड स्टॉल आणि दुकानांमधील सामानांची लूट आंदोलकांनी केली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हे आंदोलक फूड स्टॉलच्या सामनांची लूट करत असल्याचं स्पष्ट दिसत आहेत. तसंच हा प्रकार सुरू होता, त्यावेळी तिथं एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. बिहारमधील बेगूसराय, नालंदा, मुंगेर, दानापूर या ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे. मुंगेरमध्ये आंदोलकांनी टायर जाळून रस्त्यावर प्रदर्शन केलं. दानापूर- बिहाटामध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. या ठिकाणी जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती आहे.