महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथी की तारखेनुसार यावर विधानसभेत गदारोळ

Share Now

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज राज्यात साजरी होत आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत आज जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला की, राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र, राज्याचे अधिकारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत. तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर विचार करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

यावर अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर दिले. अजित पवार यांनी म्हटले की, शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये. याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे १९ फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या आमदारांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधीमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *