news

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल

Share Now

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कार चालक एकनाथ कदम याला पुढील चौकशी साठी ताब्यात घेणार आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर विनायक मेटे यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी पाच वाजता भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते.

सीआयडीच्या चौकशीत काय आढळलं ?

या प्रकरणाची सीआयडी चौकशी करत होती.विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडीने तपास केला . याशिवाय आयआरबीचे इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियंते यांचं एक पथक तयार करुन त्यांचं मत जाणून घेण्यात आलं होतं की यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते ?. सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत होतं. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *