भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम आदमी पक्षाने पाठपुरावा केला असल्याचा दावा या पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे. मजूर नसतानाही मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर मुंबई बँकेवर संचालक, अध्यक्ष म्हणून निवडून येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ते मुंबई बँकेचे अध्यक्ष असताना बँकेमध्ये आर्थिक घोटाळे व अनियमितता झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांचा विरोधी पक्षनेतेपदावरून दूर करून त्यांच्याजागी भाजपतील निष्ठावंत आणि चांगल्या आमदाराला विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता करावे अशी मागणी आपने केली आहे.