न्यायालय समोर पतीने पत्नीवर केला गोळीबार
पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये न्यायालय परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सासूला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कौटुंबिक वादातून गोळीबार केल्याचं समोर आलं असून. हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झालेल्या आरोपी दीपक ढवळेला शिरुर पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा : सोयाबीनचे पाच प्रमुख रोग आणि त्यांचे नियोजन
आरोपी दीपक ढवळे आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरु होती. न्यायालयात पोटगीसाठी दावा सुरु होता. त्याच्या सुनावणीसाठी आई आणि मुलगी न्यायालयात आल्या, यावेळी परिसरात थांबलेल्या असताना दीपक ढवळेने दोघींवर गोळ्या झाडल्या. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर सासू जखमी झाली त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळलं.
हेही वाचा : दिल्ली पोलिसांकडून नुपूर शर्मा यांना सुरक्षा
आरोपी दीपक ढवळे (रा. वाडेगव्हाण, शिरुर) हा माजी सैनिक आहे. त्याने स्वत: जवळच्या परवाना असलेल्या पिस्तुलमधून दोघींवर गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. परंतु पोलिसांनी नाकाबंदी करुन त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या भावालाही पोलिसांनी अटक केली आहे. परंतु त्याने हा हल्ला का केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेने काहीसं चिंतेचं आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, न्यायालय परिसरामध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शिरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणामध्ये आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने पुढील तपास करण्यात येत आहे. तसंच आरोपी आणि त्याचा भाऊ यांचीही कसून चौकशी केला जात आहे.