मोठी बातमी : आयपीएल मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात सीबीआयने ३ जणांना अटक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) ३ जणांना अटक केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सीबीआय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सांगितले की ,आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये एक रॅकेट कथितपणे गुंतले आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटने आयपीएल सामन्यांच्या निकालावर कथितपणे प्रभाव टाकला होता. सध्या सीबीआयने अटक केलेल्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

हि बाब चालू सिजनमधील नसून २०१९ च्या ३ वर्षांपूर्वीची आहे. या प्रकरणी मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीबाबत सीबीआयने नोंदवलेला एफआयआर २०१९ च्या हंगामाशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, फिक्सिंगची व्याप्ती किती मोठी होती किंवा त्यात कोणाचा हात होता, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. २०१९ मध्ये ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.


अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात ; शरद पवार याच्या विरोधात पोस्ट भोवणार

दिल्ली-हैदराबाद येथून अटक
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या तीन जणांपैकी एकाला दिल्लीतून आणि २ जणांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. एजन्सीने दिलीप कुमार यांना दिल्लीतील रोहिणी येथून, तर गुरराम वासू आणि गुर्राम सतीश यांना हैदराबाद येथून अटक केली आहे. हे रॅकेट २०१३ पासून सक्रिय असून, बनावट बँक खाती तयार करून सट्टेबाजीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बुकींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडली, ज्यात आवश्यक तपास बँक अधिकाऱ्यांनी केला नसल्याचा आरोप आहे. या खात्यांमध्ये सट्टेबाजीसाठी भारतातील सर्वसामान्यांकडून जे पैसे गोळा केले जात होते, ते परदेशात बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनाही हवालाद्वारे पाठवले जात होते.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण २०१३ मध्ये समोर आले होते
जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध T20 क्रिकेट लीग असल्याने, IPL नेहमीच बुकी आणि फिक्सर्सच्या नजरेखाली असते. काही वर्षांपूर्वीही लीगमध्ये बेटिंग आणि फिक्सिंगची प्रकरणे समोर आली होती. २०१३ मध्ये, राजस्थान रॉयल्सचे भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीशांत, अशोक चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात पकडले गेले आणि त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली, त्यानंतर या तिघांवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. मात्र, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *