क्राईम बिट

सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने केली आत्महत्या

Share Now
अंबाजोगाई :- सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना तालुक्यातील पट्टीवडगाव येथे १० मे रोजी घडली. 
दरम्यान, मयत अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बर्दापूर ठाण्यात रोमिओवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा १२ मे रोजी नोंद करण्यात आला. दीपाली रमेश लव्हारे (१७, रा. पट्टीवडगाव) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तिचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून, सध्या पालघर येथे कार्यरत आहेत.
दीपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख (वय २२) हा तरुण मागील काही दिवसांपासून दीपालीला त्रास देत असे. ती शिकवणीला ये जा करत असताना तो तिला वाटेत अडवून बोलण्याचा प्रयत्न करत असे. शिवाय दाबदडप करून धमकावत असे. दरम्यान, मयत दीपालीने आपल्या घरी याबाबत सांगितले होते. ६ मे रोजी दीपालीच्या वडिलांनी अकबरला समज देत त्रास देऊ नको, असे बजावले.
हेही वाचा :- “मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा..- नितेश राणे यांचा ओवैसीला इशारा
अकबरच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याच्याकडून जाच सुरू असल्याचे दीपालीने आईला सांगितले होते. आईने वडील व भाऊ आले की आपण मार्ग काढू, असे सांगून तिची समजूत काढली होती. १० मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असल्याने घरात कोणी नसताना दीपालीने घराच्या माळवदाच्या आडूला साडीने गळफास घेतला. रात्री ११ वाजेच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. नातेवाइकांच्या मदतीने आईने फासावरून खाली उतरवून दीपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले.
१२ मे रोजी दीपालीची आई सुमित्रा यांनी फिर्याद दिली. त्यावरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *