सदावर्तेनी घेतलेल्या रकमेत खोत आणि पडळकर यांचा वाटा किती? कॉंग्रेसचा भाजपला टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी आज १२ एप्रिल रोजी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?, असा खोचक प्रश्नही तपासे यांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना महेश तपासे म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा जवळपास पाच महिने आझाद मैदानावर सुरु होता. या संपाला जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे,अशा घोषणा तिथे करण्यात आल्या होत्या. गोरगरीब, कष्टकरी कामगारांकडून पैसे घेतले नाहीत असे सांगणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांकडून आधी प्रति व्यक्ती ५३० रूपये आणि त्यानंतर ३०० रूपये जमा केले, असे काल आम्हाला न्यायालयामार्फत समजले. समजा सदर पैसै हे कायदेशीर फी म्हणून घेतले गेले असतील तर त्या रकमेवर कर लागला पाहिजे. सिल्व्हर ओकवर केल्या गेलेल्या भ्याड आंदोलनातील आंदोलकांना एका चुकीच्या दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षामार्फत त्याला खुलं समर्थन देण्यात आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचाही त्या जमा केलेल्या रकमेमध्ये वाटा आहे का? हे तपासले गेले पाहिजे.’