आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांनी दिला राजीनामा
आंध्र प्रदेशच्या २४ मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत. या संदर्भात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये मंत्रिपरिषदेच्या पुनर्रचनेवर चर्चा करण्यात आली.
सूत्रांनी ही माहिती दिली की, जगन मोहन रेड्डी त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार आहेत. ११ एप्रिल रोजी नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.
मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार, विद्यमान मंत्र्यांपैकी किमान चार जणांना पुन्हा संधी मिळू शकते. नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेत जातीचा निकष महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. रेड्डी यांनी ३० मे २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच ते अडीच वर्षांनी मंत्रिमंडळात पूर्णपणे बदल करून नवीन लोकांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सध्याच्या मंत्रिमंडळाचा ८ जून २०१९ रोजी शपथविधी झाला आणि हे मंत्री ८ डिसेंबर २०२१ पर्यंत पदावर राहणार होते. कोविड-19 या जागतिक महामारीसह अनेक कारणांमुळे मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुढे ढकलण्यात आली.
मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की ते २ एप्रिल रोजी येणारे तेलुगु नववर्ष दिन यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचे आणि त्यानंतर नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे काम हाती घेतील. राज्यात ४ एप्रिल रोजी १३ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली, आता राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या २६ झाली आहे.