राज ठाकरे आणि गडकरी भेटी नंतर, दानवेंचे वक्तव्य म्हणाले..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. “ही राजकीय बैठक नव्हती. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी आलो होतो” असे नितीन गडकरी म्हणाले. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आणि मनसेला भाजपची बी टीम असंही संबोधण्यात आलं.
आता या विषयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणले ” राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आम्हाला वाटत होतं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, पण आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. पण वेगळ्या विषयावर भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
त्यानंतर काल राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी गेल्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांत भाजप-मनसे युती होणार का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.