आर्यन खान ड्रग्स प्रकणातील साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू, घातपात कि निधन?
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. या नंतर प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळणं मिळाली होती. या प्रकरणात प्रभाकर साईल हे नाव चांगलेच चर्चेत आले होते. प्रभाकर साईल हा एनसीबी साक्षीदार पंच होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनी काही गौप्यस्फोट केले होते. मात्र, प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रभाकर यांचे शुक्रवार, १ एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. प्रभाकर साईल यांचे शुक्रवारी त्यांच्या चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती प्रभाकर यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर ज्या क्रूझवरून त्याला अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते.