सख्ख्या मावस बहिणींची धावत्या रेल्वेतून उडीघेत आत्महत्या
‘आयटीआय’चं शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे, अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरातील. बुधवारी रात्री या दोन्ही मुलींनी मुंबई-कलकत्ता रेल्वेमधून पाठोपाठ उडी घेत आत्महत्या केली आहे. या दोन्ही मुली छत्तीसगड़ राज्यातील रहिवासी असून रागाच्या भरात त्यांनी घर सोडले होतं.
या घटनेनंतर हसतं-खेळतं कुटुंब आता एका क्षणात दुःखात बुडालं. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. ही घटना बुधवारी म्हणजेच २९ मार्चच्या रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
याची माहिती देताच त्यांनी घटनास्थळ गाठले अन् घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून शव-विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान, दोन्ही तरुणींची ओळख समोर आली. कुमारी बेबी राजपुत (वय १९, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि कुमारी पूजा गिरी, (वय १९, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) असं या मृतक तरुणींची नावे आहे. या दोन्ही मुली गेल्या चार दिवसांपूर्वी आयटीआयला जातो असे सांगून घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस स्टेशन गाठले आणि बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. दरम्यान, या दोन्ही तरुणींनी मुंबई-कलकत्ता रेल्वेमध्ये प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. यावेळी दोन्ही मुलींच्या अंगात आयटीआयचा गणवेश होता. असे असले तरी प्रकरण नेमकं काय आहे? हे पोलीस तपासाअंतीच समोर येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर करीत आहे.