शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिश्याला कात्री लावणारा ‘तो’ चोर सापडला
सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. चक्क ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली होती. ओबीसी नेते विजय वडेट्टीवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. स्टेजवर वडेट्टीवार यांचा सत्कार सुरु होता.या दरम्यान चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटा लांबवतानाची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु होता. पोलिसांच्या तपास दरम्यान चोर नेमका कोण ते समजले आहे. भर सभेत गर्दीमध्ये व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत करणारा चोरटा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने याआधी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. त्याचे वय फक्त 21 वर्ष आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. चोरीच्या उद्देशानेच तो सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याला आला होता.
सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील ५० हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं होत. स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या.